Paper quelling art - स्फूट लेखन
सुरनळी...Q uelling art झिरमिरत्या धारात.. भिरभिरत्या वाऱ्यात.. रुणुझुणत्या ऊन्हात.. नाजूक रसवेली ( केळी) थरथरत आहे.पक्व पाने, हरित पाने, पोपटी पाने तर लोभसच.. पण..त्याहून लोभस.. राजस.. नुकतीच फुटलेली.. इवली..इवली..सानुली.. कोवळी.. पर्ण सुरनळी.. मोठ्या मोठ्या पानांच्या कुशीत थरथरणारी.. सुरनळी.. झुलणारी.. खुलणारी पर्णोन्नळी (सुरनळी)बघताच मला आठवल्या.. दुर्गाबाई भागवत!!!साक्षात वागेश्वरी.. दुर्गेश्वरी !!! त्या संशोधनासाठी.. रानावनात भटकंती करत..प्रत्येक पानाफुलाशी..हितगूज.. कुजबुज करत..निसर् गाशी संधान साधून त्यांच्या देहाचे अलगूज झाले होते.. एकदा त्यांना कुणीतरी टोपली भर गुलाबाच्या पाकळ्या दिल्या.. लाल मखमली.. गंध पाकळ्या बघून त्या हरखून गेल्या.. काय करावे.. विचार करताना काही सूचले.. त्या कलावतीने.. प्रत्येक पाकळीची सुरनळी करून त्याचे गुच्छ कलाबुतीने.. धाग्याने बांधले.. निवाळी, बकुळी, जाई..जुई, बटन शेवंती ,पानांच्या सुरळ्या मधे मधे घालून.. हजारो पाकळ्यांचा .. सुंदर हार सहा तासाची बैठक मारुन पूर्ण केला....