आईच्या साड्या

आईच्या साड्या...
आठवड्यातून दोन दिवस मी माझी शाळा झाली की एका अनाथालयातील अंधासाठी वाचन करायला जायची. माझ्या आईला तो माझा उपक्रम भावला व म्हणाली...

" मला पण तुमच्या संस्थेसाठी काही करावे वाटते, पण मी शिकलेली नाही व मिळवतीपण नाही "
मी म्हणाले...
आई , आमच्या संस्थेतील महिलांना तू साड्या दे.
तुझ्या जवळ... पुणेरी, चंदेरी, इंदुरी, नगरी, माहेश्वरी, म्हैसुरी, बनारसी, पटौला, पैठणी, कांजीवरम.. भरजरी.. रेशमी.. सुती.. अनेक साड्यांचे भांडार आहे.
काही साड्या तू  संस्थेला दे.. आणि आई सांगायला जड जातय... पण मी नेत्रदान प्रचारक लेखन करते.. जर तुझ्या मनाला कधी वाटलं तर.. हा फाँर्म भर..."
बोलताना मला अश्रू आवरले नाहीत, मी पटकन माझ्या बेडरूममध्ये गेले.. मोकळी झाले.
3-4दिवसांनी आई पुण्याला जायला निघाली..
परत मागे फिरुन म्हणाली..." साड्या काढून ठेवते. दे त्या बायकांना." हे संभाषण आमचे 1997 मध्ये झाले.
लगेचच आईला विस्मरण होऊ लागले.. तिला अल्झायमरने ग्रासले..आमचे विचार ..मन.. थरथरले. ती चैतन्य हरपून बसली.. आम्ही औदासिन्य लेऊन बसलो.ती खंगत चालली.. आम्ही खंतावत राहिलो. ती गतीमंद झाली.. आमची मतीच गुंग झाली. ती शब्द हरवून बसली... आम्ही मूक रूदन करत तिची सेवा करत राहिलो..ती स्वमग्न झाली.. भूतकाळात रमली.. आम्ही वर्तमानच विसरलो... सारेच सैरभैर झालो.

तिची जीवन ज्योत जुलै2005 मधे मालवली.....  सप्टेंबर मधे मला वडिल म्हणाले...
तुम्ही तिघी.. बघा एकदा.. साड्या वाटून घ्या...
मला बोलताच आले नाही.. सुन्न झाले...
आम्ही तिच्या साड्यांचे भव्य दालन उघडले...
अनेक विध रंग.. पोत.. पदर.. तंतू.. तंतूत आई चे रुप दिसत होते.
काही साड्यांचे कोरेपण सुद्धा गेले नव्हते.
तिची टापटीप.. नजरेत भरत होती..
जड मनानं उत्तम स्थिती तील साड्या मी बासनात बांधल्या...
हौसेने घेतलेल्या.. प्रसंगाने आलेल्या रंगीबेरंगी साड्या .. आज... मालकीणच सोडून गेल्यावर .. दूसऱ्या... गरजू  मालकिणीकडे चालल्या होत्या..
त्या सुंदर.. मोहक.. भरजरी साड्या.. संस्थेला देताना.. नकळत पदर माझ्या बांगडीत गुंतला..
आजही त्या आश्रमातील मंगला ताई.. प्रभाताई.. आईच्या साड्या वापरतात.. आईला वाखाणतात..
अन् नकळत हात जोडले जातात.. प्रतिमा जाते.. पण मनात अविरत उरते।
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme