निर्मळ वाट...

🌾निर्मळ वाट (बक्षीस पात्र कथा)
*** जोरदार वाऱ्याने पणती विझली.भिंतीवरील फोटो हारासकट खाली पडला. सुमती बाईंच्या डोळ्यात पाणी तरळले...
*** 28 वर्षे झाली, ते जाऊन !!!
दोन चिमुकल्यांना मोठ्या धीराने एकटीने वाढवले.स्थैर्य दिले. मुलगा सियाचीनला तर मुलगी अमेरिकेत.. मस्त मजेत.
आता मात्र सुमतीबाईना एकाकी पण नकोस झाले.
घर खायला उठले.
*** दोन वर्षापूर्वी, सतीश जींची ओळख झाली. आयुष्याच्या सायंकाळी दोन जीव एकमेकांत गुंतत गेले, सोबत हवी हवीहवीशी वाटू लागली. संगत सुसह्य झाली. आणि अचानक एक दिवस सतीशजींनी विचारले...
" सुमतीबाई, आपण विवाह करावा का ?"

***क्षणभर सुरकुतल्या चेहऱ्यावर रोमांच फुलले. पण  सारासार विचार करून अंतर्मनाने एक 'निर्मळ वाट' दाखवली.
सुमतीबाईनी पत्र लिहिले...

प्रिय सतीशजीं,
आपण दोघेही वयाने पोक्त. विचार भान ठेवणे रास्त. ओढ.. आधार.. सोबत.. सहानुभूती.. म्हणजे प्रेम का? का गरज ?विवाह हे फक्त दोन तनामनाचे मिलन नाही, तर दोन कुटुंबांचे भावबंधन होय !
आपली मुले लहान असताना विवाह केला असता, तर परस्परांना समजून घेऊन ,चारही मुलांना आई..बाबा माया छत्र मिळाले असते. नात्याचा सुगंधी गोफ झाला असता.
पण... आता.. वार्धक्यातील विवाहाने आप्त अलिप्त होणार. आपल्या नात्याला स्वार्थ दर्प येणार.
तसेच विवाह एक भावनिक संस्कार व व्यावहारिक करार दोन्ही चा सुबक गोफ आहे.
आपल्या विवाहाने स्थावर.. जंगम इस्टेट, घर,वारसदार हक्क.. मालकी सारेच गुंतागुंतीचे नाही का होणार ?
आपल्या एकाकीपणाला विवाह रुप दिले तर नाते होणार. नाते म्हणजे बंधन!
अपेक्षा, अधिकार,ओझे लादणे सुरू होईल.
नाते न राहता गोते होईल.
अन् नाते निभावताना तारुण्य, जोम,पैसा, कुठून आणायचा?
अन् दुर्दैवाने आपल्यातील परत एकदा एक जण ' काळ' रुपी अंधारात निघून गेला तर एकट्याने कसं जगायचं?
विवाह म्हणजे खेळ नाही.
प्राचीन काळापासून असलेली.. पुन्हा fashionम्हणून रुजलेली
विनाविवाह एकत्र राहणे.. live in चा आपण विचार करूया.
यौवनावस्थेत live in घातक वाटते. कारण तनामनाचा तोल जातो.
व्याभिचार.. स्वैराचार.. कुमारी माता.. परित्यक्ता..
अशी विघातक साखळी तयार होते....
*** पण सतीशजीं..
आपली गोष्ट वेगळी. आपली जीवन नौका उताराकडे झुकते... विषय वासना च्या पलिकडे ..
कातरवेळी.. एक आधार .. एक सोबत म्हणून आपण एकत्र राहुया. परस्पर सहकारी बनुया.
आकाशासम निरभ्र मनाने पवित्र मैत्र जपुया. विचार देवाण..घेवाण करूया.
तरुणांना आपल्या साठी वेळ नाही.. तो वेळ एकमेकांना देऊया.थरथरत्या शरीरानं धीम्या गतीने एकमेकांना सहकार्य, सोबत करुया
विवाह नामक लेबलं नकोच!
वर्डस्वर्थची.. डँफोडिल्स ...सोनसळी प्रवाह..निर्मळ !!!
साचलेल्या डबक्यातून नवप्रवाह निर्माण करण्याची नवसर्जनता ही कविता देते.
तद्वत आपण बंधनात न अडकता अनुबंध .. निर्मळ वाट निर्माण करु..
तूमची मैत्रीण.. सुमती.

***सुमतीबाईनी पत्राची घडी घातली. फोटो तील पतीचा हासरा चेहरा अनुमोदक वाटला.बाहेरचे वारे व मनातील वादळ शांत झाले होते.
आता एकटेपणा संपणार.
सतीशजींचा आधार मिळणार.. दिवाळी.. साजरी होणार... या आशेने.. पणती परत चेतवली.. काजळी फुंकली.. वाट निर्मळ बनली ,,,
उन्नती गाडगीळ 🙏🌹
 कथा लहान करून दिली आहे. क्षमस्व
(मनोगत दिवाळी अंक 2008 मधे प्रसिद्ध व बक्षिस प्राप्त )

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme