#विवाह सोहळा...💐

#विवाह सोहळा..
एका लग्नाला मी आईसह गेले होते. आईच्या आग्रहास्तव पहिल्यांदाच साडी नेसली होती...
तयामुळे बोंगा आवरणे,पदर सावरणे हेच चालू होते..
दिवस भर तेथे माझे भावी सासुसासरे,दोघी नणंदा..आठ नजरा माझ्या वर पाळत ठेऊन होत्या. खुदुखुदू हासत होत्या. कुजबुजत होत्या...

माझे वय 17पूर्ण. मला काहीच कळत नव्हतं.
सासुबाईंनी आईजवळ माझा फोटो मागितला.
आईने दिला...

आईने सहज फोटो दिला. पण तो फोटो सहज त्या लोकांनी.. अमदाबादला मुलाला पाठवला..

आईच्या जीवाची घालमेल.." काय करावे बाई, मुलगा फोटो पाठवेना!"
चार महिन्यांनी मुलगा आला.
मग आईने, आजीने मला सांगितले,
" मान्य आहे तुझे वय लहान. पण लगेच थोडेच जमते !'"
मी फणफणतच साडी नेसली.
गाडगीळ संपूर्ण कुटुंबाने मला बघीतले होते. तरीही .. बटाटे पोहे ( कांदा सासुबाई ना वर्ज्य) कार्यक्रमाला हीsss गर्दी !!! प्रश्नांच्या फेरी !!!
मुलगा गप्प !!!मोजून, मापून एकच प्रश्न विचारला,
"अमदाबादला यायला आवडेल ना?"
अन् माझ्या आईला सांगितले,
"काळजी करू नका, फोटो माझ्या जवळ सुखरूप आहे!"

जोरदार खसखस पिकली. कुजबुज वाढली.. कोपरखळ्या, इशारे, हास्य विनोदात मैफिल रंगली!

आमचे दोघांचे शब्दच खुंटलेले..
पण.. अत्तराचा फाया लपून बसतो,पण सुगंध मात्र आसमंत दरवळतो!
अशी गत झाली होती!

नात्यांच्या विळख्यात च भेटत होतो...
साखरपुडा करून हे परत अमदाबादला गेले.

पत्रा.. पत्रातून.. फोनच्या तारा तारातून.. गुंतत राहीलो.

सर्वानुमते 17डिसेंबर 1973 ला .. नात्यागोत्याचा जमला मेळा..
भावभावनांचा दाटला उमाळा..
संपन्न जाहला.. विवाह सोहळा!!!सर्व कुटुंबाचे प्रेम लाभले, आशीर्वाद रुपी फुले वेचत...सदिच्छारुपी अक्षदांचा वर्षाव झाला.
शिक्षण पूर्ण करत. जबाबदाऱ्या पार पाडत... दोन सुखवेली बहरल्या..
फुलल्या.. फळल्या..
त्यांच्या रंगात..आम्ही उभयता रंगतो, गंधाळतो.
अनेक काटेकुटे एक दिलाने वेचले..
असे कधीच वाटले नाही की.. प्रेमात हरलो आहोत.
उलट हरपलो . हरखून गेलो. 45वर्ष मजेत.. मुरलो.
कथी विटून.. फाटून पनीर नाही झाले...
उलट.. परिस्थिती च्या ज्वाळात एकसंघ प्रेम जास्त  घोटले गेले..अन्  मलईयुक्त रबडी झाले !!!

" वसंतातले चंदन नाते..
वर्षाकाळात खुलुनी येते।
परि शिशिरात ना गळते पाते..
अजोड हे पती.. पत्नी चे नाते।

दोअंतरीचा एक ' हुंकार'..
देतो जन्मोजन्मीचा जोडीदार।
असा हा विवाह संस्कार..
अनमोल.. अलंकार।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme