तोडगा...💐

🌸तोडगा..
मागील वर्षी याच दिवसात.. एक व्रुद्ध स्त्री.. उंच, धिप्पाड, नऊवारी साडी.. ओचा सोडलेला..पदर खोचलेला.. भाळी बुक्का.. गळ्यात तुळशी माळ..कष्टाने रापलेला चेहरा..कणखर.. दणकट!!!

मला विचारले..
" ताई, मला बी घ्यावा ना तुमच्या भजनात?"
काळ्या भोर डोळ्यात आर्जव होते..
मी संमती दिली.. सुमा ताई यायला लागली..

माझ्या लक्षात आले की या ताई लिहीत नाहीत.
अन् भजन, हरिपाठ.. सारे झाले तरीही रात्री आठ पर्यंत मंदिरात बसून असतात.
मी विचारताच त्या म्हणाल्या..

" ताई, मी  तीस आणि दोन वर्षे माळीण काम केले. कष्ट मोप होते पन् पगार बी मिळत होता.
7 महिने झाले मी रिटायर झाली..
अन् आता चोबीस तास घरात असते मग..

"माझी सून अश्शीच हाय..तश्शीच हाय !तिने मला ह्येच नाय दिलं.. त्येच नाय दिलं..मुद्दाम च अशी वागते.. असे इचार सुरू झाले. रोज खटके उडू लागले.. अगदी शिवीगाळ सुरू झाली..

मग इचार केला..
मी नोकरीत असताना.. हीच सून लै गुनाची वाटत होती.. म्हणजे.. लक्षात आले..

घरापासून दूर रहावे, अ़ंग काढून घेतले.. लै अपेक्षा नाही ठेवल्या की समदं सुरळीत चालतय बगा !
मी रातला आठला घरला जाते. !!!"

मी त्यांना म्हणले..
 '" तुमचा तोडगा लय भारी ! पण नुसतं न बसता.. मी रोज एक अक्षर देईन ते गिरवत रहा..

आज एका वर्षात.. त्या नुसत्या साक्षर नाही झाल्या तर त्या .. धडाधड वाचतात.. अगदी जोडाक्षरे,अंक,बेरजा वजाबाकी... सारे शिकल्या.. आता हरिपाठ, स्तोत्रे, आरत्या.. छान वाचतात, पाठ करतात..

त्यांचा वेळही छान जातो..
अन् घरही शांत रहाते.अन् त्या शिकल्या यामुळे मला आनंद झाला..
उन्नती गाडगीळ. 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme