सासरचे पाहुणे..💐

#नस्ती-उठाठेव.. भाग..2
सासरचे पाहुणे मंडळी...

1979...फेब्रुवारी.. पुण्याहून माझ्या बरोबर प्रवासात..79वयाचे माझे सासरे,70वयाच्या सासुबाई, आजारी नणंद, माझी 4वर्षाची मुलगी व 2महिन्याची मुलगी .. प्रवास चालू..

बरोबरच्या कुणालाही टाँयलेट मधे जायचे असेल, तर प्रत्येक वेळी ,समोरच्या सह प्रवासीला.. बाळाकडे लक्ष द्यावे, सांगून.. या सर्वाबरोबर मलाच जावे लागे.

कुणाला काही खायला देणे..पाणी देणे.. खाली उतरून काही..(पाणी..,वगैरे)आणणे,हे सर्व मलाच करावे लागले.

पण.. माझ्या सासुबाई व सासरे वयोवृद्ध असले तरी जाणूनबुजून त्रास देणारे नव्हते..
उलट दोघांच्या मुखी विनोदाची गुटी होती. ..

ती ख्रिश्चन बाई फर्डा इंग्रजी झाडत व मी इंग्रजी चा खुर्दा करत .. आमचे संभाषण चालू होते..

तिने विचारले..
What is your husband?
मी उत्तरले..
My husband is working at Airport !

माझ्या चाणाक्ष सासुबाईं  च्या लक्षात आले..की त्यांच्या मुलाबद्दल आम्ही बोलत आहोत.

त्या गालात खुदुखुदु हासत म्हणाल्या..

" बंड?बंड कुणाला म्हणता ग? अर्थात *दत्ता* माझा होताच बालपणी बंड !!!
अन् सासरे पण मिष्कीलपणे म्हणाले..

" आता आहे.. *तरणा बांड!* ..

मुंबई ला उतरणे.. चार तास फलाटावर मुक्काम.. त्या चार तासात.. माझ्या सर्वांना ,बाळाला,सामानासह संभाळणे..खाणे..पिणे.. भुणभुण, कुरकुर.. साहणे..
अन् परत एकदा.. सर्वांसह धावपळ.. गर्दी.. चेंगराचेंगरी.. मी ओली बाळंतीण.. त्यात सिझेरियन पेशंट.. पण ठेवून पेशन्स.. चढलो.. एकदाचे.. अमदाबादच्या गाडीत !!!हुश्य !!!

गाडीत.. मोठ्या लेकीची व आजोबांची गट्टी जमली होती.. ते बिचारे.. तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरे न थकता देत होते..
तिच्या गाण्यांवर जांभयांचा ताल.. गाडीचा झपताल.. मधे.. मधे.. माझ्या छोटीचे.. टँsssहा.. सूर..मस्त  सरमिसळ !!!

सूरत आले..

"एsss घाsssरी---

ऐकून.. परत एक विनोदाची पुडी... सासऱ्यांनी सोडली...

"" बघ.. बघ..तुला.. घारी म्हणतोय .. तो..'"

सासुबाईंची लाजून.. हासून .. पुरेवाट.. घाऱ्या डोळ्यातून..आनंद धारा..

असा मजेत.. खात .. पित.. छेडा छेडी.. करत..परत .. उतरणे.. सामान... काळजी.. रिक्षा.. करत आमच्या घरी  पोहोचलो!

आमचा बाग.. बगिचा.. टुमदार घर हे त्यांना आवडायचेच !

लग्गेचच..
''अरे दत्ता.. बागेची दुर्दशा केलीस रे..
उन्नतीने किती निगराणी केली होती !""

लगेचच सासरे..
आता.. घराचीच बाग फुलली..
दोन..गोजिरी फुले फुलली!"'

आमच्या घरी .. ते दोघेही मजेत होते...
एक तर ते वयोवृद्ध, आजारी नणंद, त्यामुळे..
माझा मात्र पिट्टा पडला..
मला.. तेल,पाणी तर सोडाच माझी आंघोळ सुद्धा कावळ्याची!

त्यांचे सोवळे ओवळे जपणे, नणंदेचे तंत्र संभाळणे.. कसरत सारी!

रोज पहाटे मी सासऱ्यांसह प्रभात फेरी ..
त्यांचे पूर्वायुष्य... अनुभव... सर्व गाठोडी सोडली जायची.. मी ऐकत रहायची.. मनात साठवायची!

ते आले म्हणून.. पावभाजी, ढोकळा, चाँकलेट बर्फी, फाफडा, बदाम शेक, असे विविध प्रकारचे पदार्थ करायची..
तेव्हा.. सासुबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या..

'''तुमच्या घरी नेहमीच माहेरपण होते हो!
येथे सकाळी उठून..
कोळश्यात हात घाला..
बंब पेटवा.. शेणाने सारवा... राँकेल भरा..
अन् रोज.. रोज.. तेच तेच डिचके रांधा.. वाढा.. उष्टी काढा.. असे काहीच करावे लागत नाही हो मला... आमच्या घरात..मात्र
आज सत्तर वर्षे झाली वयाला.. पण..कष्टातून सुटका नाही !!!""

कष्टकरी स्त्री चे प्रातिनिधिक रुपच आपले मनोगत व्यक्त करत होते !!!
तसेच एकदा त्या म्हणाल्या..

'' अकरा बाळंतपणे झाली... मुलं जन्माला आले की दहा दिवसानंतर.. चूल सारवणे..रांधणे.. वरच्या मुलांच्या आंघोळीपांघोळी...  घर चालवणे..!"

हे सर्व मी ऐकले.. तेव्हा.. मी का बरं मनात कुरकुरले..असे मला वाटले..

मी.. दोन महिन्याची बाळंतीण आहे.. मला आराम नाही.. वगैरे..

एकदा ..आमच्या अंगणात गाय व्याली..
तिचा हंबरडा, प्रसव वेदना, ऐकून मी घाबरले..
पण.. सासुबाई नी  गायीला धीर दिला..तिच्या पाठीवर हात फिरवत ती वृद्ध माता  होऊ घातलेल्या गोमाते जवळ चार तास बसून होती!

मला त्यांनी गायीसाठी खिचडा करायला शिकवला.. तिच्या सहज सुलभ सुटकेसाठी.. त्या मृत्यूंजय मंत्र जपत होत्या.
.. गायीसाठी पाणी आण म्हणताच.. मी तांब्या भर दिले..

खळखळून हासत त्या ..

अग.. वेडाबाई.. जनावरे एकावेळी.. बादलीभर पाणी पितात!!!

प्रत्येक वेळी..ते उभयता पाहुणे म्हणून आले की.. काही ना काही.. मानवतेचा.. समाधानी वृत्ती चा संस्कार माझ्यावर..घरादारावर करून निरोप घेत..

ऐसे पाहुणे येती घरा..
तोचि दिवाळी.. दसरा।
उन्नती गाडगीळ🌹🙏
Amruta Joshi Mulay .
Swati Chhatre-Maydeo.

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme