पूजन..कथन 💐

💥पूजन..कथन..
पौर्णिमेचा मुहूर्त साधून श्री. सत्यनारायण पूजा केली. आणि एकेक स्मरण मोती ओघळू लागले..

1979म़धे माझे सासू सासरे अहमदाबादला आमचेकडे आले होते.आम्ही सत्यनारायण करायचे ठरवले. परप्रांतात  गुरूजी अचानक मिळणे अवघड.

सासऱ्यांनी फर्मान काढले..
."'उन्नती,तू संस्कृत शिकलेली.स्वच्छ उच्चार तर तू पूजा सांग.दत्ता करेल !!!"
अरे बापरे !!!कधीच असे काही केले नाही. अन् सासऱ्यांसमोर पूजा सांगणे?

ते *टेन्शन *टपकन् टपकलं !
मी नेटानं त्याला ढकललं!
आणि श्री. सत्यनारायणाची पोथी हाती घेतली. आदल्या वर्षी मी एका गुरजींना स्वहस्ते लिहून दिली होती.त्यामुळे शब्द मनावर ठसल होतेच.

सतत दोन दिवस पोथीचे वाचन केले. अवजड, अवघड शब्दांचे पुनर्वाचन केले. वाचेला घासून पुसून वाणी लख्ख केली .स्वच्छ उच्चार येऊ लागले.
प्रत्येक शब्दात नाद हा असतोच. त्याला तालासुरात गुंफायच ,त्याचा तोल राखणे,लय निर्माण कयणे,चढ..उतार,वळणे,आवर्तनातून उत्पन्न होणारी  कंपने ...लहरी..
या सर्वांनासुसूत्र बांधून श्रोत्यांच्या श्रृती तृप्त करणे,आणि स्वमन अंतर्मुख होणे..
श्लोकाचा सुगम, सुबोध अर्थ ,विवेचन, मग सुरस कथा कथन..टाळ,घंटा निनादात ठेक्यात आरत्या
सुरस पण गंभीर .. मंत्रपुष्पांजली आणि भावपूर्ण उत्तर पूजा..

एवढा मोठा प्रवास.. एकदिड तासाची बैठक,आपल्या श्वासाश्वासात भारलेले शब्दअन् त्यांनी तद्रूप .. संमोहित झालेले वातावरण ..

हे सारे चित्र नजरेसमोर ठेवून.. सासऱ्यांसमोर बसून, अभ्यास केला...

संपूर्ण पूजन कथन करताना सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान..जणू ..दाखला च!
सासरे खूष झाले. म्हणाले.

"उन्नती, सरळ पौरोहित्य शिक. अन् स्वव्यवसाय कर.उच्चार खणखणीत आहेत तुझे.आणि स्वरात संमोहन शक्ती आहे.!"

पण मी वेडी.. इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत होते.असो.

मग दरवर्षी आमच्या घरात मीच पूजा सांगत असे.

नंतर कँसेट चा जमाना आला.घरातले व्याप,शाळेचा वाढता पसारा, नाटके..वगैरे..

पौरोहित्य शिकणे मागे पडले..

1995मध्ये मी चार दिवस पुण्याला गेले होते. तेथे आईची शेजार सखी कुरकुरली..

"काकू, पूजा ठरवली.अन् अचानक गुरुजींचा येत नाही, म्हणून फोन. काय करू हो?"
आईने क्षणार्धात तिला धीर दिला..

"अग,आमची उन्नती सांगते पूजा. आहे ती येथे !"

आई शब्द देऊन बसली.अन् मैत्रीण निर्धास्त राहिली.

मग काय.. संपूर्ण चार तास उजळणी.. आईसमोर रंगीत तालीम झाली.

अन् दुसरे दिनी  सोवळे नेसून, गेले त्यांच्याकडे पूजा सांगायला.पूजा कथन झाले.

 ""विष्णूसहस्त्र नामावली,म्हणाल का? "

एक वृद्ध संस्कृत पंडित विचारत होते.

ती झाली. ते एकदम भारावून..

"शाब्बास!स्पष्ट उच्चार!विवेचन ही छान!"

पावती मिळाली.
पण.. पौरोहित्य शिक्षण राहून गेले.

घरात पूजा सांगते खरी.पण.. चौरंगावरील सर्व व मानधन देवळातील गुरूजी ना देते.
कथन माझा छंद आहे. व्यवसाय नाही.

काल मी पूजा सांगताना अडखळत होते, बैठक मोडत होती,लय बिघडत होती, दमायला झाले .स्मरण शक्ती क्षीण झाली.म्हणजेच..आता छंदाला सुद्धा निरोप द्यावा लागतोय. ..असो.

संस्कार ,रोप लावताना, रूजवताना,आनंदाने मन फुलले होते.. मग निरोपही
तितकाच आनंदाने.. हासत हासत पूर्ण समाधाने घेते.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme