मसाले भात..💐

👩‍🎤मसाले भात..
श्री. मुकुंद सावंत यांच्या विनंती वरून मसाले भात देत आहे..

साहित्य--- 2वाट्या तांदूळ(उत्तम प्रतीचे) पाव वाटी मटार दाणे,एका गाजराचे उभे आखूड काप,4छोटे अख्खे कांदे (किंवा एक मोठा कांदा चिरून) तेल.काजू,गोडामसाला,तिखट, मीठ, गूळ,कोथिंबीर,नारळचव.

सुका मसाला----
पाव वाटी सुके खोबरे कीस भाजून घेणे.त्यात धने,जीरे,तीळ,दालचिनी, लवंग, किंचित जायफळ, वेलची व केशर घालून बारीक पूड करणे.

ओला मसाला----
किंचित आले,दोन पाकळी लसूण(या भातात मसाल्याचा स्वाद महत्त्वाचा, म्हणून आले -लसूण नाममात्र घालणे)व  1हिरवी मिरची,1लाल टोमॅटो,1विड्याचे पान.सर्व वाटून घ्यावे.

*कृती..
भात करण्यापूर्वी अर्धा तास तरी तांदूळ धुवून निथळत ठेवणे.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल,मोहरी,हिंग,हळद, कढीपत्ता ..कांदे परतणे.नंतर मटार दाणे,गाजर ,सर्व भाज्या घालून परतून,सुका मसाला परतणे,नंतर धुतलेले तांदूळ घालून परतावे. ओला मसाला, व दुप्पट गरम पाणी घालणे. तिखट, मीठ, गूळ, गोडा मसाला घालून झाकण ठेवावे. दणदणीत तीन,चार,वाफा आल्या की जरा हलवून बघावे.मधून मधून हालवून परत झाकण ठेवावे. हवे असेल तर थोडे गरम पाणी घालून छान शिजवावा.
बोटचेपा झाला की खाली तवा ठेवून ,भातात थोडी कोथिंबीर व दोन चमचे साय फेटून घालून हालवून झाकण ठेवावे.
भात फुलून आला की वाढण्यापूर्वी..
लोखंडी कढल्यात/पळीत ( लोह,आणि थोडे साजूक तूप आरोग्य संरक्षक)
दोन चमचे साजूक तूप ,1तमालपत्र, हिंग,चार मिरेदाणे,हळद ,1लालमिरची ,काजू अशी चुरचुरीत फोडणी करून वरून ओतावी. नीट हलवून वाढणे..

***प्रेशर कुकर मधे सुद्धा छान होतो.

***या भातात.. स्वीट काँर्न,बेबी काँर्न, सिमला मिरची, तोंडली,बटाटा, मेथीचे मुटके,पनीर ,फ्लावर तुरे,अनेक भाज्या घालून, विविध रंगसंगती साधून भात करू शकतो.

सजावट---
केळीच्या पानावर भाताची मूद घालून त्यावर खोबरं कोथिंबीर पखरण करून, काजू पाकळीने सजवून, तुपाची धार,बाजूला लिंबाची फोड,लोणचे,पापड, कढी/मठ्ठा सह देणे ही पद्धत आहे.

अजूनही अनेक प्रकारची सजावट करू शकतो.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme