ऊन..सावली..💐

🎴ऊन..सावली.

.कानटोपी गालावर ओढत..
कोटाच्या खिशात हात लपवत..
हा..हा..हु..हू..बाराखडी म्हणत...
धुक्याची वलये निरखत...

तन थरथरत चालत होते..
मन माझे *ऊन* शोधत होते।

बिच्चारी सावली बसली होती, पारावर.. फुगवत गाल..
लपेटून हरित पर्णी शाल।
खुणावत होती .. थरथरत..

*'"ये ना ग.. माझ्या सोबत!"*

घाबरतच मी दिला.. नकार..
नक्कोच तुझा स्पर्श गारेगार।

मिजासखोर ऊन डोंगरावर चढलं होत..
तेथूनच खूपच भाव खात होतं।

उनाड वारं मात्र मोकाट सुटलं..
नाकातोंडाशी झोंबत राहिलं।

सावली साळसूद म्हणाली मला...
"ठिक आहे ! नंतर बघून घेईन तुला।

आता.. उत्तरायण सुरु होईल..
तो नाठाळ सूर्य आग ओकेल।
मग..येशील तू माझ्या राशीला..
क्षणभर विसावा मागायला।

* तेव्हा मी बोलावेन गर्दीला..
अन्.. उन्हात उभं करेन तुला।" *

ऐकून मी लागले.. मुळुमुळु रडायला..
कवेत घेऊन मला,सावली लागली बोलायला..

*'अग, मी माणूस नाही, डूक धरून, सूड उगवायला..
रणरणत्या .. उन्हात ..मी असेनच तुझ्या दिमतीला!!!*
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme