जीव..💐

👪 जीव..

ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडीने जीव नकोसा केला होता. तरीही..

तेथेच तळ ठोकून, डोंबारी जीव तोडून ढोलकं बडवत होता..पोटची पोर इवला जीव मुठीत धरून दोरीवरून चालत होती..
ते बघताना आईचा जीव टांगणीला लागला होता..
डोंबाऱ्याचा मुलगा जीवाच्या आकांताने ओरडून.. वाडगा फिरवत होता..

बघे जीव ओतून जीवाशी चाललेला खेळ बघत ,टाळ्या पिटत होते.ती मुलगी खाली उतरताच सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
कथलाच्या वाडग्यातील खणखणती नाणी बघून डोंबाऱ्याचा जीव सुखावला..

दोन जीवाची असलेली ती डोंबारीण विचार करू लागली..

"'पोटात वाढणारा जीव मुलीचा असावा..उद्या मोठी पोरं सासरी गेल्यावर .. या कोवळ्या जीवाला दोरीवर चढवता येईल,धंदा चालू राहील..

डोंबाऱ्याचा मुलगा विचार करू लागला..
हा वाडगा फिरवत किती दिवस  जीव रमवायचा?
रातच्या शाळेत जाऊन अभ्यास करून.. शिपाई गडी व्हायला हवे अन् जीवापाड मेहनत करून,एखादे खोपटे बांधून ,त्या रंगीसोबत दोन जीवांनी एकजीव होऊन जगले पाहिजे..

दोरावरुन खाली उतरलेल्या मुलीला वाटले..
सर्व कुटुंब माझ्या जीवावर पैसे मिळवतात, पन् मला एक बी पैसाा देत नाहीत.
मी पन पैसेवाल्या गड्यावर जीव लावेन.. त्याच्या संग जीवाची मुंबई करेन...

धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme